रायगड(प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील रोहा तालुका व नागोठणे परिसरातील अतिवृष्टीग्रस्त दुकानदार व टपरीधारकांना त्यांच्या व्यावसायिक नुकसानीपोटी विशेष/वाढीव दराने आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासोबतच राज्यातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना कपडे, घरगुती भांडी व वस्तूंच्या नुकसानीसाठीही विशेष/वाढीव दराने मदत मिळणार आहे. यासाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात जिल्हाधिकाऱ्यांना कोषागारातून निधी आहरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनील तटकरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यामुळे यश आले आहे.
रोहा व नागोठणे परिसरासह रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे दुकाने आणि टपऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेक छोट्या व्यावसायिकांचे व्यवसायाचे साहित्य, मालमत्ता तसेच दुकानांच्या संरचनेचे नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या या दुकानदार व टपरीधारकांना केवळ नियमित मदतीपुरते मर्यादित न ठेवता विशेष/वाढीव दराने मदत मिळावी, यासाठी मंत्री आदिती तटकरे यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला.
याच अनुषंगाने दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी मंत्रालयातील मंत्री आदिती तटकरे यांच्या दालनात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत रायगड जिल्ह्यातील घरे, दुकाने, शेती, पशुधन तसेच इतर मालमत्तेच्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विशेषतः नागोठणे व रोहा परिसरातील नुकसानग्रस्त दुकानदार व टपरीधारकांना नुकसानभरपाई तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री आदिती तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
नुकसानग्रस्त दुकानांचे पंचनामे पूर्ण झाले असून, दुकानांच्या नुकसानीसाठीचा प्रस्ताव विभागीय स्तरावरून शासनाकडे तातडीने सादर करण्याच्या सूचना विभागीय स्तर व रायगड जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. त्यानिर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या प्रस्तावास मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय श्रीमती सुनेत्राकाकी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाने संमती दिली आहे.
मंत्री आदिती तटकरे यांच्या या पाठपुराव्यानंतर मदत व पुनर्वसन विभागाने शासन निर्णय जारी करून दुकानदार व टपरीधारकांच्या नुकसानीसाठी विशेष/वाढीव दराने मदत वितरित करण्यासाठी निधी वितरणास मान्यता दिली आहे. दुकानदार व टपरीधारकांच्या नुकसानीसाठी लेखाशीर्ष २२४५-२३८१ अंतर्गत देयके अदा करण्यात येणार आहेत.
तसेच नैसर्गिक आपत्तीग्रस्त कुटुंबांच्या कपडे तसेच घरगुती भांडी व वस्तूंच्या नुकसानीसाठी लेखाशीर्ष २२४५-२१९४ अंतर्गत निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना उणे (-) प्राधिकरण पत्रावर कोषागारातून निधी वितरीत करता येणार असून, संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामे झाले असल्याची खातरजमा करूनच निधीचे वितरण करावे, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त दुकानदार आणि टपरीधारकांना त्यांच्या व्यवसायाशी संबंधित नुकसानीसाठी विशेष/वाढीव दराने आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे व्यवसायावर आलेल्या संकटातून सावरण्यासाठी छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शेती, पशुधन, घरे, दुकाने, टपऱ्या तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांच्या नुकसानीची प्रकरणे प्राधान्याने निकाली काढून आपत्तीग्रस्तांना त्वरित दिलासा मिळावा, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत.
“नैसर्गिक आपत्तीमध्ये सामान्य नागरिकांसोबतच छोटे दुकानदार आणि टपरीधारक यांचेही मोठे नुकसान होते. त्यांचा व्यवसायच त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आधार असतो. त्यामुळे त्यांच्या नुकसानीची तातडीने दखल घेऊन त्यांना विशेष/वाढीव दराने मदत मिळणे आवश्यक होते. रोहा व नागोठण्यासह रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त दुकानदार व टपरीधारकांच्या प्रश्नावर मंत्रालयात आढावा बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले होते. आता शासनाने निधी वितरणास मान्यता दिल्याने या नुकसानग्रस्त व्यावसायिकांना प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा प्रशासनाने मदत वितरणाची कार्यवाही लवकर पूर्ण करावी,” अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
मंत्री आदिती तटकरे यांच्या पुढाकारामुळे रोहा-नागोठणे परिसरासह रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त दुकानदार व टपरीधारकांसह नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. शासनाच्या निधी वितरणाच्या मान्यतेनंतर पात्र नुकसानग्रस्तांना नियमानुसार मदत वितरित करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू होणार आहे.









