सर्वांना सोबत घेऊन रायगडच्या विकासासाठी काम करणार – पालकमंत्री भरत गोगावले


अलिबाग (प्रतिनिधी) : पंडितशेठ पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया देताना रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी संयमी भूमिका घेतली. पंडितशेठ हे आपले जुने मित्र असून जिल्हा परिषद सदस्यत्वाच्या काळापासून आपली त्यांच्याशी मैत्री असल्याचे गोगावले यांनी स्पष्ट केले. राजकारणात प्रत्येकाची बोलण्याची स्वतःची शैली असते. त्यांनी काय बोलले किंवा काय बोलले नाही, याबाबत आपण अधिक भाष्य करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

गोगावले म्हणाले की, पंडितशेठ पाटील यांच्याशी माझी जुनी मैत्री आहे. जिल्हा परिषदपासून आम्ही एकत्र राजकीय प्रवास केला आहे. ते आमदार होते आणि त्याच काळात मीदेखील आमदार होतो. त्यामुळे आमच्यात जुने मैत्रीचे संबंध आहेत. त्यांनी काही वक्तव्य केले असेल, तरी त्याकडे राजकीय दृष्टिकोनातून न पाहता आपण पुढे जाणार आहोत.

सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेणार

रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी कोणतेही राजकीय मतभेद आड येऊ न देता सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार पालकमंत्री गोगावले यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील सात आमदार, दोन खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, विविध सभापती, पंचायत समितीचे सभापती व सदस्य तसेच नगरपालिका महापौर, नगराध्यक्ष आणि इतर लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन विकासकामे मार्गी लावली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्याला सोबत घेऊन विकासाचा अजेंडा पुढे नेण्यावर आपला भर राहणार असल्याचे गोगावले यांनी सांगितले.

नेत्यांकडून स्वागत, सन्मान

पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील विविध नेत्यांकडून होत असलेल्या स्वागताचाही गोगावले यांनी उल्लेख केला. पप्पूशेठ यांच्यासह विविध नेत्यांनी भेट घेतली असून, संजयशेठ यांच्या घरीही जाऊन भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. या भेटींमध्ये मिळालेला सन्मान आणि आपुलकी ही रायगडच्या राजकीय समन्वयासाठी सकारात्मक बाब असल्याचे त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट झाले.

दरम्यान, पालकमंत्री भरत गोगावले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पार्पण करून अभिवादन केले. त्यानंतर ते महत्त्वाच्या बैठकीसाठी रवाना झाले. रायगडच्या विकासासाठी सर्वपक्षीय व सर्वसमावेशक समन्वय ठेवून काम करण्याचा संदेश या माध्यमातून त्यांनी दिला.