संघर्षातून पालकमंत्रीपदापर्यंत : भरतशेट गोगावले यांच्या नेतृत्वाची प्रेरणादायी गाथा


शेतकरी कुटुंबातून राजकारणात प्रवेश, मुंबईत कजरे विकण्यापासून पेपर आणि दुधाची लाइन टाकण्यापर्यंतचा संघर्ष… ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून आमदार, मंत्री आणि आता रायगडच्या पालकमंत्रीपदापर्यंतचा थक्क करणारा प्रवास. हा प्रवास आहे संघर्षयात्री नेतृत्व म्हणून ओळख निर्माण करणारे नामदार भरतशेट गोगावले यांचा.

अंगात साधा कुर्ता-पायजमा, हातात नॅपकिन, वाढलेली दाढी, कपाळावर तिळा आणि बोटात सोन्याच्या अंगठ्या… हे व्यक्तिमत्त्व रायगडच्या राजकारणात परिचित आहे. प्रेमाने सर्वजण त्यांना ‘भरतशेट’ म्हणून संबोधतात. मात्र, “मी श्रीमंतांचा शेट नाही, तर गरीबांचा शेट आहे,” असे अभिमानाने सांगणारे भरतशेट गोगावले हे सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात धावून जाणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात.

महाड तालुक्यातील कांगोरी गडाच्या पायथ्याशी असलेल्या छोट्याशा पिंपलवाडी गावातील शेतकरी कुटुंबात भरतशेट गोगावले यांचा जन्म झाला. साध्या परिस्थितीतून आलेल्या भरतशेट यांनी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. मुंबईत कजरे विकण्यापासून ते पेपरची आणि दुधाची लाइन टाकण्यापर्यंत त्यांनी विविध कामे केली. कोणतेही काम लहान नसते, हा संदेश ते आपल्या संघर्षाच्या अनुभवातून नेहमीच देतात.

गरिबाच्या झोपडीचे दार जसे चोवीस तास सर्वांसाठी खुले असते, तसेच भरतशेट यांच्या घराचे दारही सर्वसामान्यांसाठी कायम खुले राहिले. त्यांच्या घरी मदतीच्या अपेक्षेने आलेला माणूस शक्य तितका समाधान घेऊनच परत जावा, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळेच रायगडच्या जनतेच्या मनात त्यांच्याविषयी जिव्हाळा आणि आपलेपणाची भावना निर्माण झाली.

सरपंचपदापासून राजकीय प्रवासाला सुरुवात

सन 1987 मध्ये पिंपलवाडी ग्रामपंचायतीच्या बिनविरोध सरपंचपदाची जबाबदारी स्वीकारत भरतशेट गोगावले यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर 1992 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून पंचायत समिती सदस्यपद मिळवले. 1997 मध्ये ते जिल्हा परिषद सदस्य झाले.

जिल्हा परिषदेत त्यांनी कृषी व पशुसंवर्धन सभापती तसेच अर्थ व बांधकाम सभापती म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांच्या पत्नी सौ. सुषमा ताई गोगावले यांनाही जनतेने दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून संधी दिली. त्यामुळे गोगावले कुटुंबाचे जनतेशी असलेले नाते अधिक दृढ झाले.

यानंतर विधानसभा राजकारणात प्रवेश करत 2009 ते 2024 या कालावधीत त्यांनी सलग चार वेळा आमदार म्हणून विजय मिळवला. मतदारसंघातील जनतेशी असलेला थेट संपर्क, कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आणि विकासकामांचा ध्यास यामुळे त्यांचे नेतृत्व दिवसेंदिवस मजबूत होत गेले.

विधिमंडळातील विविध जबाबदाऱ्या

आमदारकीच्या काळात भरतशेट गोगावले यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात विविध महत्त्वाच्या समित्यांवर काम केले. 2009 ते 2014 या कालावधीत ते महाराष्ट्र विधानमंडळाच्या पंचायतराज समितीचे सदस्य होते. 2019 मध्ये त्यांनी अंदाज समितीचे सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडली. 2022 पासून रायगड प्राधिकरण समितीच्या कामातही त्यांनी सहभाग घेतला.

2024 मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे आली. सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या एसटी महामंडळाच्या माध्यमातून ग्रामीण भागाशी जोडलेले प्रश्न सोडविण्याची संधी त्यांना मिळाली.

यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. आता त्यांच्या राजकीय प्रवासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून भरतशेट गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे.

शिंदे यांच्या नेतृत्वाला खंबीर साथ

भरतशेट गोगावले यांच्या राजकीय प्रवासात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ महत्त्वाची ठरली. 2022 मध्ये शिवसेनेतील राजकीय घडामोडींमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला भरतशेट गोगावले यांनी खंबीर साथ दिली. त्या काळातील त्यांच्या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात त्यांचे नाव विशेष चर्चेत आले.

हनुमंताने प्रभू श्रीरामांना दिलेल्या निष्ठावान साथीप्रमाणे आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला साथ दिली, अशी उपमा त्यांच्या समर्थकांकडून दिली जाते. या निष्ठेमुळे शिंदे यांच्या नेतृत्वातील राजकीय वाटचालीत भरतशेट गोगावले हे महत्त्वाचे सहकारी म्हणून पुढे आले.

“मूळ आणि कूळ विसरू नका”

“माणूस कितीही मोठा झाला, तरी त्याने आपले मूळ आणि कूळ कधीही विसरू नये,” हा संदेश भरतशेट गोगावले आपल्या भाषणांमधून वारंवार देतात. स्वतःच्या संघर्षमय जीवनाकडे पाहताना त्यांनी आपल्या सामान्य पार्श्वभूमीचा कधीही संकोच केला नाही. उलट, त्याच संघर्षाला त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची ताकद बनवले.

ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून सुरू झालेला प्रवास आज कॅबिनेट मंत्री आणि रायगडच्या पालकमंत्रीपदापर्यंत पोहोचला आहे. पदे बदलली, जबाबदाऱ्या वाढल्या, राजकीय कक्षा विस्तारल्या; मात्र साधी राहणी, कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळा आणि सर्वसामान्यांशी असलेले नाते कायम राहिले, अशी त्यांच्या समर्थकांची भावना आहे.

रायगडच्या विकासाची नवी जबाबदारी

आज भरतशेट गोगावले यांच्यावर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मोठी जबाबदारी आली आहे. रायगड हा इतिहास, उद्योग, पर्यटन, शेती, मत्स्यव्यवसाय आणि वेगाने विकसित होणाऱ्या शहरी भागांचा जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी संतुलित नियोजन करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

“मी आज जो काही आहे, तो रायगड, महाड आणि माझ्या मतदारसंघातील जनतेमुळे आहे,” असे भरतशेट नेहमी सांगतात. त्यामुळे पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती देणे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे आणि जिल्ह्यातील विविध भागांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे, ही त्यांच्यासाठी पुढील वाटचालीतील महत्त्वाची जबाबदारी ठरणार आहे.

मुंबईत कजरे विकणाऱ्या आणि पेपर-दुधाची लाइन टाकणाऱ्या एका सामान्य कुटुंबातील तरुणापासून ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री आणि आता रायगडचे पालकमंत्री असा भरतशेट गोगावले यांचा प्रवास निश्चितच संघर्ष, जिद्द, जनसंपर्क आणि राजकीय निष्ठेची कहाणी सांगणारा आहे.

पिंपलवाडीच्या मातीतून उभे राहिलेले हे नेतृत्व आज शिवभूमी रायगडची जबाबदारी सांभाळत आहे. त्यामुळे संघर्षातून घडलेले लोकनेतृत्व आणि रायगडच्या जनतेच्या विश्वासाचे प्रतीक म्हणून भरतशेट गोगावले यांच्या पालकमंत्रीपदाच्या नव्या पर्वाकडे पाहिले जात आहे.

रायगडचे पालकमंत्री नामदार भरतशेट गोगावले यांना पालकमंत्रीपदाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

धनंजय कवठेकर : (अलिबाग)