कौशल्याच्या बळावर महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे : डॉ. साक्षी पाटील


अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे ६० महिलांसाठी आयोजित १४ दिवसीय ब्युटीपार्लर प्रशिक्षणाचा गुरुवारी शुभारंभ झाला. २० ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या या प्रशिक्षणातून महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.

“महिलांना केवळ कौशल्य देणे नव्हे, तर त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभारून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे,” असे महिला व बालकल्याण सभापती डॉ. साक्षी पाटील यांनी सांगितले. उपसभापती ॲड. अश्विनी ठोसर यांनी महिलांनी कौशल्य व आत्मविश्वासाच्या बळावर स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आवाहन केले.

मन्नत मल्टीपर्पज असोसिएशन अध्यक्ष मुस्कान रफिक झटाम पेण यांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण देण्यात येत असून प्रशिक्षक सायली शिंदे व वैष्णवी गावंड मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमास नगरसेविका, अधिकारी-कर्मचारी व प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.

नगराध्यक्षा अक्षया नाईक, उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे आणि मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेला हा उपक्रम महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.