सिव्हिलच्या विद्युत सुरक्षेचा खेळखंडोबा


रायगड (प्रतिनिधी): जिल्हा रुग्णालयातील सध्याची परिस्थिती पाहता रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे चित्र समोर येत आहे. जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या आणि आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित करणारी बाब समोर आली आहे. रुग्णालयाचे विद्युत ऑडिटच झाले नसल्याची माहिती समोर आल्याने सिव्हिल रुग्णालयातील सुरक्षेचा कारभार अक्षरशः वाऱ्यावर सोडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
जिल्ह्यातील हजारो रुग्णांसाठी महत्त्वाचे असलेल्या या रुग्णालयात चोवीस तास वीजपुरवठा सुरू असतो. आयसीयू, ऑपरेशन थिएटर, ऑक्सिजन यंत्रणा, व्हेंटिलेटर आणि विविध अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे विजेवर अवलंबून आहेत. अशा ठिकाणी विद्युत यंत्रणेची सुरक्षा तपासणीच होत नसेल, तर रुग्णालय प्रशासन नेमके कोणत्या सुरक्षेच्या भरोशावर कारभार चालवत आहे?
अमरावतीतील भीषण रुग्णालय दुर्घटनेने संपूर्ण राज्यातील रुग्णालयांच्या विद्युत आणि अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 24 ऑगस्ट रोजी अमरावती जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालयातील विद्युत यंत्रणा, उपकरणांची देखभाल आणि सुरक्षा ऑडिटवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर अलिबागच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचे विद्युत ऑडिट झाले आहे का? असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे. जर विद्युत ऑडिट झालेलेच नसेल, तर अमरावतीसारख्या दुर्घटनेतूनही प्रशासनाने धडा घेतलेला नाही का, असा संतप्त सवाल शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी उपस्थित केला आहे. अमरावतीसारखी दुर्घटना घडल्यानंतर चौकशी समित्या नेमण्यापेक्षा दुर्घटना होण्यापूर्वीच विद्युत ऑडिट करून संभाव्य धोके दूर करणे गरजेचे आहे.

शॉर्टसर्किटनंतर पंचनामा नको; आधीच खबरदारी हवी
विद्युत यंत्रणेतील एखादा बिघाड किंवा शॉर्टसर्किट मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण देऊ शकतो. आग लागल्यास गंभीर अवस्थेतील रुग्णांना सुरक्षित बाहेर काढणेही मोठे आव्हान ठरू शकते. विशेषतः आयसीयू किंवा ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांच्या जीविताला थेट धोका निर्माण होऊ शकतो. मात्र संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याऐवजी दुर्घटना घडण्याची वाट पाहिली जात आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

ऑडिट नाही…जबाबदारी कोणाची?
विद्युत ऑडिट झाले नसल्यास त्याला जबाबदार कोण? रुग्णालयातील विद्युत यंत्रणेची शेवटची तपासणी कधी झाली? विद्युत सुरक्षेतील त्रुटी कोणत्या? त्या दूर करण्यासाठी काय उपाय केले? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने जनतेसमोर देणे आवश्यक आहे.

दुर्घटना होण्यापूर्वी ऑडिट करा!
रुग्णांच्या जीविताशी संबंधित हा प्रश्न असल्याने तातडीने संपूर्ण विद्युत सुरक्षा ऑडिट करून त्रुटींचा अहवाल सार्वजनिक करावा आणि धोकादायक यंत्रणा त्वरित दुरुस्त करावी, अशी मागणी शेकापकडून करण्यात येत आहे.

सिव्हिलमध्ये 51 टक्के पदे रिक्त
194 मंजूर पदांपैकी तब्बल 99 जागा रिकाम्या
रायगड जिल्ह्याच्या मुख्य शासकीय रुग्णालयातच मनुष्यबळाचा मोठा तुटवडा असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, रायगड-अलिबागमधील विविध संवर्गातील 194 मंजूर पदांपैकी तब्बल 99 पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच रुग्णालयातील जवळपास 51 टक्के पदांवर कर्मचारीच उपलब्ध नाहीत.
उपलब्ध आकडेवारीनुसार तज्ज्ञ डॉक्टरांची 42 पदे मंजूर असताना 16 पदे भरलेली असून तब्बल 26 पदे रिक्त आहेत. तर अधिपरिचारिकांची 96 मंजूर पदांपैकी 55 पदे भरलेली असून 41 पदे रिक्त आहेत. रुग्णालयातील रुग्णसेवेचा मोठा भार याच मनुष्यबळावर असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याचे चित्र आहे.
याशिवाय सिस्टर ट्यूटरची 13, क्लिनिकल इन्स्ट्रक्टरची 2, शुश्रुषा अधिकाऱ्याची 1, प्राचार्याची 1 आणि उपप्राचार्याची 1 पदे रिक्त आहेत. नेत्रचिकित्सा अधिकाऱ्यांच्या 12 मंजूर पदांपैकी 11 पदे भरलेली असली तरी एक पद रिक्त आहे. वरिष्ठ लिपिकाची दोन, स्वच्छता निरीक्षकाची एक आणि कनिष्ठ लिपिकाची चार पदेही रिक्त असल्याचे कागदपत्रातून स्पष्ट होते.
दरम्यान, जिल्हा रुग्णालय अलिबाग अंतर्गत एआरटी केंद्रासाठी 2026 मध्ये स्टाफ नर्स आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या कंत्राटी नियुक्तीसाठी स्वतंत्र भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. मात्र नियमित आस्थापनेवरील मोठ्या प्रमाणातील रिक्त पदांचा प्रश्न कायम असल्याने रुग्णालयातील रुग्णसेवा, डॉक्टर-कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण आणि उपचारांच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सिव्हिलची अवस्था
मंजूर पदे : 194
भरलेली पदे : 95
रिक्त पदे : 99

महत्वाचे मुद्दे
1. गेल्या 13 वर्षात जिल्हा रुग्णालयावर जवळपास 15 कोटी रुपये खर्च केले आहे.
2. ऑगस्ट 2021 मध्ये जिल्हा रुग्णालयातील अपंग विभागात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचीही घटना घडली आहे.
3. 2022 मध्ये प्रसुतीदरम्यान नवजात बालकाच्या मृत्यूप्रकरणी डॉ. प्रियल शेंडे यांना विशेष चौकशी समितीने जबाबदार ठरविले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4. अलिकडेच जून 2026 मध्ये रुग्णालयाचा स्लॅब कोसळण्याची घटना घडली.
5. 2024 मध्ये अलिबाग नगरपालिकेने धोकादायक इमारतींना नोटीसा पाठविल्या होत्या. त्यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचा समावेश होता.