महामार्गावरील अडचणी लवकर सोडवाव्यात : पालकमंत्री भरत गोगावले


गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल-पळस्पे ते माणगावपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना

रायगड (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात ये-जा करणाऱ्या गणेशभक्तांना प्रवासादरम्यान कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी महामार्गावरील प्रलंबित कामे आणि वाहतुकीच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, असे निर्देश रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी प्रशासनाला दिले.

गणेशोत्सव काळात मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच अन्य भागांतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणाकडे रवाना होतात. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री भरत गोगावले यांनी पनवेल-पळस्पे ते माणगावपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी महामार्गावरील सुरू असलेली कामे, वाहतुकीची स्थिती, रस्त्याची अवस्था, अपूर्ण कामांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी तसेच संभाव्य वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली.

गणेशोत्सव काळात महामार्गावर वाहतूक सुरळीत राहण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात. वाहनचालकांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी रस्त्यावरील अडथळे दूर करून आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक नियमनाची व्यवस्था करावी, अशा सूचनाही गोगावले यांनी दिल्या.

महामार्गावरील कामांमुळे वाहतुकीवर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्याबरोबरच गणेशोत्सवाच्या काळात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल, प्रांताधिकारी प्रवीण पवार तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांकडून महामार्गावरील कामांची सद्यस्थिती आणि गणेशोत्सवाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती पालकमंत्र्यांनी घेतली.

दरम्यान, शांतता समितीच्या बैठकीतही गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. विविध सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस दलाकडून करण्यात येणाऱ्या नियोजनाचे पालकमंत्री गोगावले यांनी कौतुक केले. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करून उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले.