‘शब्दसृष्टी-अनुवादसृष्टी’तर्फे विशेषांकाचे प्रकाशन; मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती
अलिबाग (प्रतिनिधी): तमिळ भाषेतील दर्जेदार साहित्य मराठी वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अनुवाद क्षेत्रात भरीव योगदान देणारे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. श्रीप्रकाश अधिकारी यांच्या साहित्यिक कार्याचा गौरव करण्यात आला. ‘शब्दसृष्टी-अनुवादसृष्टी’तर्फे ‘प्राचार्य श्रीप्रकाश अधिकारी गौरव विशेषांक’ पनवेल येथे प्रकाशित करण्यात आला.
प्रख्यात साहित्यिक, समीक्षक व अनुवादक गजानन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला हिंदी कवी व समीक्षक राजेशकुमार सिन्हा, साहित्यिक व अनुवादक प्रकाश भातंब्रेकर, पटकथालेखक व दिग्दर्शक पथीक वत्स तसेच ज्येष्ठ लेखक व अनुवादक चंद्रकांत भोंजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकात मुख्य संपादक डॉ. मनोहर यांनी ‘शब्दसृष्टी-अनुवादसृष्टी’च्या अनुवादविषयक उपक्रमांची माहिती देत प्रा. अधिकारी यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव केला. अध्यक्षीय भाषणात गजानन चव्हाण यांनी तमिळमधून मराठीत प्रा. अधिकारी यांनी केलेले गद्य व पद्य अनुवाद अद्वितीय आणि दिशादर्शक असल्याचे सांगितले.
यावेळी प्रा. श्रीप्रकाश अधिकारी यांनी आपल्या साहित्यिक प्रवासातील प्रेरणादायी आठवणींना उजाळा दिला. शिक्षक डॉ. जी. रामकृष्ण, वडील अॅड. चंद्रकांत अधिकारी आणि ज्येष्ठ साहित्यिक यदुनाथ थत्ते यांचे आपल्या वाटचालीतील योगदान त्यांनी आवर्जून नमूद केले. साने गुरुजींच्या ‘आंतरभारती’ संकल्पनेतून तमिळ साहित्य मराठी वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा आपला प्रयत्न असल्याचे प्रा. अधिकारी यांनी सांगितले. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त तमिळ साहित्यिक वैरमुथू यांचे ध्वनिचित्रफितीद्वारे संदेशप्रसारण करण्यात आले. मूळ इंग्रजी भाषणाचा सौ. पूर्णा अधिकारी यांनी केलेला मराठी अनुवाद विशेष आकर्षण ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य मुकुंद आंधळकर यांनी केले, तर आभार श्री. प्रणव अधिकारी यांनी मानले. साहित्यिक विजय बाबा सावंत, साने गुरुजी स्मारक ट्रस्टचे सुधीर देसाई व प्रमोद निगुडकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे रमेश गोविलकर, डॉ. संजय कर्णिक, लेखिका अनुराधा कुलकर्णी यांच्यासह साहित्य व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.









