अलिबाग (प्रतिनिधी): माजी मंत्री स्व. मीनाक्षीताई पाटील यांच्या जन्मदिनी नाना पाटील विद्यालय संकुलाच्या प्रांगणात त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. लोकप्रतिनिधी म्हणून केलेले उल्लेखनीय कार्य, प्रभावी वक्तृत्व, धाडसी व्यक्तिमत्त्व आणि माणुसकी जपणारा स्वभाव यामुळे मीनाक्षीताई पाटील यांचे व्यक्तिमत्त्व समाजासाठी कायम प्रेरणादायी राहिले आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा सोहळा भावनिक आणि अविस्मरणीय ठरला.
मीनाक्षीताई पाटील यांनी लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविला. त्यांचे प्रभावी वक्तृत्व आणि निर्भीड भूमिका यांची आजही आठवण केली जाते. त्याचबरोबर सर्वसामान्यांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवत माणुसकीची नाळ त्यांनी कायम जपली. त्यामुळे त्यांचे कार्य आणि विचार पुढील पिढ्यांसाठी आदर्शवत असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
जन्मदिनीच त्यांच्या पुतळ्याचे अनावरण होत असल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. मीनाक्षीताई पाटील यांच्यावर प्रेम करणारे नागरिक, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. महेंद्रशेठ यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी स्व. मीनाक्षीताई पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
त्यांच्या पुतळ्याच्या रूपाने मीनाक्षीताई पाटील यांच्या कार्याची आणि विचारांची आठवण कायम जिवंत राहणार असून, हा पुतळा भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाला उपस्थित आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार पंडित पाटील, सभापती वैकुंठ पाटील, आस्वाद पाटील, डॅ.चित्रा पाटील, भावना पाटील, भाजप सरचिटणीस अॅड महेश मोहिते, ॲड गौतम पाटील, शंकरराव म्हात्रे, नाईक अण्णा,माजी सभापती बाळुशेठ, पंचायत समिती सदस्य शैलेश पाटील, जि.प सदस्य अनंत गोंधळी आदी मान्यवर उपस्थित होते.









