अलिबाग(प्रतिनिधी) : अलिबाग, रायगडच्या मातीत घडलेला गोविंदा आता थेट आंतरराष्ट्रीय मंचावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविण्यासाठी सज्ज झाला आहे. स्पेनमधील विलाफ्रांका, कॅटालोनिया येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘Concurs de Castells 2026’ या आंतरराष्ट्रीय मानवी मनोरे स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान रायगडमधील गोविंदा पथकाला मिळाला आहे.
भारतीय मानवी मनोऱ्यांची परंपरा, गोविंदा पथकांची सांघिक ताकद आणि देशाच्या सांस्कृतिक परंपरेचे प्रात्यक्षिक आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर करण्यासाठी हे पथक स्पेनमध्ये सहभागी होत आहे. या निमित्ताने अलिबाग आणि रायगडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
या आंतरराष्ट्रीय सहभागासाठी श्री. मरीआई मेटपाडा गोविंदा पथकाचे प्रशिक्षक तसेच रायगड जिल्हा दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे अध्यक्ष कु. कुणाल दत्ताराम मोर्ले यांचे विशेष योगदान आहे. गोविंदा पथकाच्या माध्यमातून भारतीय मानवी मनोऱ्यांची कला आणि त्यामागील सांघिक भावना जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
स्पेनमध्ये होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमात भारतीय संघाकडून भारताचा तिरंगा उंचावून भारतीय मानवी मनोऱ्यांचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे. त्यामुळे या सहभागाकडे केवळ क्रीडा किंवा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून नव्हे, तर रायगडच्या पारंपरिक गोविंदा संस्कृतीला मिळालेली आंतरराष्ट्रीय ओळख म्हणून पाहिले जात आहे.
कुणाल मोर्ले यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माजी नगराध्यक्षा प्रशांत नाईक आणि अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. रायगडच्या मातीतून तयार झालेला गोविंदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करत असल्याने अलिबागकर आणि रायगडवासीयांमध्ये अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.









