टँकच्या स्फोटाने परिसर हादरला; दोन कामगार जखमी, कंपनीचे मोठे नुकसान
महाड (प्रतिनिधी): एमआयडीसी परिसरातील सिनर्जिया केम इंडस्ट्रीज कंपनीत टँकचा भीषण स्फोट झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या दुर्घटनेत दोन कामगार जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी सेल्टोली गावातील बितीन लाड हे गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीमध्ये ऑलियम आणि सल्फर यांची रिअॅक्शन सुरू असताना रिअॅक्टरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा स्फोट इतका भीषण होता की त्याचे हादरे आसपासच्या गावांपर्यंत जाणवले. स्फोटानंतर कंपनी परिसरातून आगीच्या ज्वाला आणि धुराचे तसेच धुळीचे मोठे लोट दिसून आले.
स्फोटाची तीव्रता मोठी असल्याने सिनर्जिया केम इंडस्ट्रीजच्या स्ट्रक्चरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कंपनीचे काही भाग अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत. या स्फोटाचा परिणाम परिसरातील इतर कारखान्यांवरही झाल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दरम्यान, घटनास्थळी सध्या कोणत्याही प्रकारची वायू किंवा गॅस गळती नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दुर्घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
एमआयडीसी परिसरात मागील काही वर्षांत वायूगळती तसेच स्फोटांच्या घटना घडल्याने औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारखान्यांमध्ये सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, नियमित सुरक्षा तपासणी करावी आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी सक्षम यंत्रणा उभारावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
या स्फोटाचे नेमके कारण, झालेल्या नुकसानीचे प्रमाण आणि सुरक्षेतील संभाव्य त्रुटी याबाबत संबंधित यंत्रणांकडून तपास केला जात आहे.









