पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दुर्घटना; महाकाली वॉटर स्पोर्ट्सचे कर्मचारी व स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात यश
दिवेआगर, रायगड : पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून सहलीसाठी रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध दिवेआगर समुद्रकिनारी आलेल्या विद्यार्थ्यांच्या गटातील आठ जणांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (१ ऑक्टोबर) घडली. पाण्याची खोली आणि समुद्रातील लाटांचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आळंदी येथील विनर्स अकॅडमी फॉर ११वी अँड १२वी या खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांची सहल दिवेआगर येथे आली होती. या सहलीत विद्यार्थी आणि शिक्षकांचा मोठा गट सहभागी झाला होता. समुद्रकिनारी फिरत असताना काही जण समुद्राच्या पाण्यात उतरले. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने आठ जण समुद्रात बुडाल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, प्रशासन आणि बचाव पथकांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. महाकाली वॉटर स्पोर्ट्सच्या कर्मचाऱ्यांनी बचावकार्यात महत्त्वाची भूमिका बजावत स्थानिक नागरिकांना सहकार्य केले. अथक प्रयत्नांनंतर समुद्रातून सर्व आठ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
या दुर्घटनेमुळे दिवेआगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. समुद्रात उतरताना पाण्याची खोली, लाटांची तीव्रता आणि स्थानिक प्रशासनाच्या सुरक्षाविषयक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, मृतदेह पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रियेसाठी बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले आहेत. या घटनेचा पुढील तपास संबंधित पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे.









