गावकऱ्यांच्या पाठपुराव्याला यश; अतिदुर्गम भागातील नागरिकांची गैरसोय दूर
नव्या बससेवेचा प्रवाशांसोबत आमदारांनी घेतला अनुभव
श्रीवर्धन (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या कारीवने गावातील नागरिकांची एसटी बसअभावी होणारी गैरसोय अखेर दूर झाली आहे. गावकऱ्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कारीवने गावासाठी एसटी बससेवा सुरू केली आहे. या नव्या बससेवेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आमदार अनिकेत तटकरे यांनी कारीवने गावाला भेट देत एसटी बसमधून प्रवास केला.
कारीवने हे श्रीवर्धन तालुक्यातील दुर्गम भागात वसलेले गाव असल्याने येथील नागरिकांना दळणवळणासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर जाणाऱ्या नागरिकांना सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नसल्याने खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते.
गावात नियमित एसटी सेवा सुरू करण्यात यावी, यासाठी ग्रामस्थांकडून संबंधित विभागाकडे सातत्याने मागणी व पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर या मागणीची दखल घेत एसटी महामंडळाने गावासाठी बससेवा सुरू केली.
बससेवा सुरू झाल्यानंतर आमदार अनिकेत तटकरे यांनी कारीवने गावाला भेट देऊन नव्याने सुरू झालेल्या एसटी बसमधून प्रवास केला. प्रवासादरम्यान त्यांनी बसमधील प्रवाशांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. यावेळी प्रवाशांसोबत गप्पा मारताना आमदार तटकरे दिसून आले.
गावापर्यंत एसटी पोहोचल्याने नागरिकांना शिक्षण, आरोग्य, बाजारपेठ तसेच शासकीय कामांसाठी ये-जा करणे अधिक सुलभ होणार असून, या बससेवेमुळे कारीवने परिसरातील दळणवळणाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.









