अलिबाग (प्रतिनिधी) : नागाव समुद्रकिनारी वाढत्या पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन पर्यटकांना अधिक चांगल्या व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीचे फॅब्रिकेटेड शौचालय व बाथरूम सुविधा उभारण्यात आली आहे. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र चार-चार सीटची ही सुविधा सर्व आवश्यक सोयींनी सुसज्ज असून, तिचे उद्घाटन आज जिल्हा परिषद सदस्य तथा अध्यक्ष श्री. मंगेश वाकडीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
नागावच्या पर्यटनविकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या सरपंच सौ. हर्षदा निखिल मयेकर यांच्या विशेष प्रयत्नांतून व पुढाकारातून ही सुविधा नागाव समुद्रकिनारी उपलब्ध झाली आहे. पर्यटकांना आवश्यक मूलभूत सुविधा मिळाव्यात, नागाव समुद्रकिनाऱ्याचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा आणि नागावची पर्यटन ओळख अधिक सक्षम व्हावी, यासाठी सौ. हर्षदा मयेकर यांच्या माध्यमातून विविध स्तरांवर सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य श्री. सचिन राऊळ, ग्रामपंचायत माजी सरपंच श्री. नंदकुमार मयेकर, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य श्री. निखिल मयेकर, उपसरपंच सौ. मंगला नागे, सदस्य सौ. प्रियांका काटे, सौ. निकिता पाडेकर, सदस्या सौ. वीणा पिंपळे , अनेक ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. मंगेश वाकडीकर यांनी नागावच्या पर्यटनवृद्धीसाठी CSR माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. नागाव समुद्रकिनाऱ्याच्या विकासासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.
तसेच जिल्हा परिषद सदस्य श्री. सचिन राऊळ हे नागावच्या पर्यटनविकासासाठी सातत्याने सहकार्य व पाठपुरावा करत असून, समुद्रकिनाऱ्याच्या विकासासह पर्यटकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभत आहे.
यावेळी सरपंच सौ. हर्षदा निखिल मयेकर म्हणाल्या, “नागाव समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पर्यटकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता आहे. आज उपलब्ध झालेली ही सुविधा नागावच्या पर्यटनविकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. भविष्यातही महाराष्ट्र पर्यटन विभाग, जिल्हा परिषद, लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायतीच्या समन्वयातून नागावमध्ये आणखी विविध पर्यटन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.”
नागावचा समुद्रकिनारा अधिक स्वच्छ, सुंदर, सुविधायुक्त आणि पर्यटकाभिमुख करण्याच्या दिशेने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नांना या सुविधेमुळे आणखी बळ मिळाले आहे.









