दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल; महाराष्ट्रातून लाखो भाविकांनी घेतले दर्शन
खोपोली (दत्तात्रय शेंडगे) : असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीसंत बाळूमामा देवांचा जन्मोत्सव सोहळा लोणावळा येथील पांगोळी धनगरवस्तीमधील श्रीसंत बाळूमामा मंदिरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त महाराष्ट्राच्या विविध भागांतून लाखो भाविकांनी उपस्थिती लावत श्रीसंत बाळूमामांचे दर्शन घेतले. दिवसभर विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली.
रायगड आणि पुणे जिल्ह्यांच्या मध्यवर्ती भागात असलेल्या लोणावळा येथील पांगोळी धनगरवस्तीमध्ये श्रीसंत बाळूमामांचे भव्य मंदिर आहे. या मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांची मोठी श्रद्धा असून, दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. श्रीसंत बाळूमामांच्या जन्मोत्सवानिमित्त मंदिर परिसराला विशेष सजावट करण्यात आली होती. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. संपूर्ण परिसर बाळूमामांच्या जयघोषाने आणि भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता.
जन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात सकाळी श्रीसंत बाळूमामांच्या अभिषेकाने आणि आरतीने करण्यात आली. त्यानंतर सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले. दुपारच्या सत्रात भजनाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर श्रीसंत बाळूमामांचा जन्मोत्सव पाळणा भक्तिभावाने साजरा करण्यात आला. तसेच हरिपाठाच्या कार्यक्रमातून भक्तांनी आध्यात्मिक आनंद अनुभवला.
रात्री महाआरतीने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. त्यानंतर ह.भ.प. अजय महाराज तरडे यांचे श्रीसंत बाळूमामांच्या जीवनकार्यावर आणि त्यांच्या आध्यात्मिक महात्म्यावर आधारित सुश्राव्य कीर्तन झाले. महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून बाळूमामांच्या विचारांचे आणि भक्तीपरंपरेचे महत्त्व उपस्थित भाविकांसमोर मांडले. या कीर्तनाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अखेरीस महाप्रसादाचे वाटप करून या सोहळ्याची सांगता करण्यात आली.
या जन्मोत्सव सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी दिवसभर मंदिरात उपस्थित राहून श्रीसंत बाळूमामांचे दर्शन घेतले. श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने भारलेल्या या सोहळ्यामुळे पांगोळी धनगरवस्ती परिसरात धार्मिक उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
या सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांची दर्शन, भोजन आणि इतर आवश्यक सुविधांच्या दृष्टीने योग्य व्यवस्था श्रीसंत बाळूमामा देवस्थान ट्रस्ट तसेच पांगोळी धनगरवस्ती येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती. देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या नियोजनबद्ध सहकार्यामुळे श्रीसंत बाळूमामांचा जन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.









