अलिबाग (प्रतिनिधी) : व्यवसायासोबतच सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्था, अलिबाग यांच्या वतीने रामराज येथील श्री सांबेश्वर मंदिरात भाविक व नागरिकांना बसण्यासाठी बेंच उपलब्ध करून देण्यात आले. संस्थेच्या या उपक्रमामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना तसेच स्थानिक नागरिकांना बसण्यासाठी सोयीची व्यवस्था उपलब्ध झाली आहे.
सहकार क्षेत्रात कार्यरत असताना केवळ आर्थिक व्यवहारांपुरते मर्यादित न राहता समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून जनहिताचे उपक्रम राबविणे, हे आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्याचे वैशिष्ट्य ठरत आहे. याच सामाजिक जाणिवेतून संस्थेने रामराज येथील श्री सांबेश्वर मंदिरात बेंच उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे.
मंदिर हे श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकतेचे केंद्र असते. येथे दर्शनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह सर्व भाविकांना विश्रांतीसाठी बसण्याची सुविधा मिळणे आवश्यक असते. ही गरज लक्षात घेऊन आदर्श पतसंस्थेने केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. संस्थेच्या या छोटेखानी; मात्र उपयुक्त उपक्रमामुळे भाविकांना दिलासा मिळणार असून, नागरिकांमध्येही समाधान व्यक्त केले जात आहे.
सेवा, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम साधणाऱ्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या या स्तुत्य कार्याबद्दल रामराज येथील ग्रामस्थांनी संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
व्यवसाय करताना सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून समाजाच्या गरजांना प्राधान्य देणाऱ्या अशा उपक्रमांमुळे सहकार क्षेत्राची समाजाभिमुख प्रतिमा अधिक दृढ होत आहे. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने राबविलेला हा उपक्रम इतर संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरणारा आहे.









