मुरुड (प्रतिनिधी): मुरुड पोलिसांनी काशीद समुद्रकिनारी सुमारे ११.१४८ किलो चरस जप्त करत एका मोठ्या अंमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या चरसची अंदाजे बाजारभावातील किंमत ५५ लाख ७४ हजार रुपये असल्याचे सांगितले जाते. ही कारवाई ३१ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता करण्यात आली.
पोलिसांना संशयास्पद प्लास्टिकच्या गोणीत अंमली पदार्थ असल्याची माहिती मिळताच मुरुड पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक तपासात संबंधित गोणीत चरस असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मुरुड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा क्रमांक ५०/२०२५ नोंदवण्यात आला आहे. संबंधित प्रकरणात कलम ८(क), २०(ब)(क), आणि २२(क) अंतर्गत कारवाई सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रतीक्षा खेतमाळीस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेत अविनाश पाटील, जनार्दन गवळे, हरी मेंगाळ, मकरंद पाटील, धनखील सुते, कैलास धनमसे, संतोष मराडे आणि सुदाम उकाडे यांनी मोलाचा सहभाग दिला.
पोलिसांचा पुढील तपास सुरू असून, अंमली पदार्थ साठवणूक आणि तस्करीचा विस्तृत तपास केला जात आहे.









