रायगड (खास प्रतिनिधी): आजकाल ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुकीच्या घटना उघड होत आहेत. रायगड जिल्ह्यात अशाच प्रकरणाचा पर्दाफाश करत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बनावट AM 999, परिमॅच आणि मधुर मटका या तीन ऑनलाइन गेमिंग ॲपच्या माध्यमातून लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी भारमल हनुमान मीना (३८) याला अटक करण्यात आली आहे. अलिबाग येथे राहणाऱ्या एका नागरिकाची तब्बल १० हजार रुपयांची फसवणूक झाल्यानंतर ही कारवाई उघडकीस आली.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून तपास सुरू करण्यात आला असता, या ॲप्सच्या माध्यमातून शेकडो लोकांना गंडा घालण्यात आल्याचे समोर आले. विशेष म्हणजे पोलिसांच्या तपासात या नेटवर्कमधून ३ हजार कोटींहून अधिक रुपयांची अवैध रक्कम विविध बँक खात्यांमध्ये फिरवली गेल्याचे आढळून आले असून, ती रक्कम गोठवण्यात आली आहे.
या संपूर्ण कारवाईत रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी थेट नेतृत्व करत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय स्तरावरील फसवणूक जाळ्याचा मागोवा घेण्यात यश आले आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांत रायगडमध्ये अशा प्रकारची इंटरनॅशनल पातळीवरील ही तिसरी-चौथी कारवाई असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणात काही बडे अधिकारी आणि राजकीय नेत्यांचा हात असण्याची शक्यता वर्तवली जात असून तपास अधिकाऱ्यांनी त्याबाबतची छाननी सुरू केली आहे. त्यामुळे या कारवाईनंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. आतापर्यंतची ही सर्वात मोठी व धडक कारवाई मानली जात असून, जिल्ह्यातील लोकांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
रायगड पोलिसांच्या या पावलामुळे ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीवर अंकुश बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









