चित्रलेखा पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर


अलिबाग (प्रतिनिधी): सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील बळीराजावर संकट ओढावले आहे.  मुसळधार पावसामुळे शेती पाण्याखाली गेली आहे. मराठवाड्यात तर शेतीचा चिखल झाला आहे. याचा फटका रायगड जिल्ह्यालाही चांगलाच बसला. मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे. अशी परिस्थिती असताना आमदार साहेब आणि त्यांचे बगलबच्चे तुला करण्यात मग्न आहेत. तर दुसऱ्या बाजूला चित्रलेखा पाटील यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची व्यथा समजून घेतली. लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा शेकाप तीव्र आंदोलन करणार, असा इशाराही दिला.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील विशेष करून अलिबाग तालुक्यातील खारेपाट व अन्य भागातील भातपीक पाण्याखाली गेले. शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी बुधवारी (दि.1) खारेपाट परिसरातील नुकसान झालेल्या भात पिकांची पाहणी केली. शहापूर, धेरंड येथील शेतकऱ्यांसोबत संवाद साधत शेकाप तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही दिली. दरम्यान, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तात्काळ पंचनामे  करण्याची सुचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य अनिल पाटील, शेकाप शेतकरी तालुका सभा अध्यक्ष अनिल पाटील, शेकाप तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, राजन पांचाळ, विक्रांत वार्डे आदी शेकाप पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
शेतकरी कामगार पक्ष कायमच तळागाळातील घटकाशी बांधिलकी जपणारा पक्ष म्हणून ओळखला जातो.शेतकरी, कष्टकरी कामगारांच्या हितासाठी काम करणारा पक्ष म्हणून शेकापची ख्याती आहे. अतिवृष्टीमुळे भातशेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. ही बाब शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी अलिबाग तालुक्यातील धेरंड, शहापूर येथील शेताच्या बांधावर जाऊन तेथील नुकसानीची पाहणी केली. बांधबंदिस्ती करिता आर्थिक मदत जाहीर केली. शेतकऱ्यांशी संवाद साधत शेकाप शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही चित्रलेखा पाटील यांनी दिली.

आमदारांचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष
मी  अलिबाग मुरूड मतदार संघाचा आमदार आहे, अशी बतावणी दळवी अनेक ठिकाणी करून प्रशासन व अन्य यंत्रणेवर दबाव आणण्याचा कायमच प्रयत्न करीत आले आहेत. मात्र त्यांच्याच मतदार संघातील शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात सापडला असताना त्याकडे मात्र त्यांचे दूर्लक्ष असल्याचे समोर आले आहे. तुला कार्यक्रमात आमदार दळवी मग्न आणि शेतकरी वाऱ्यावर असे चित्र दिसून येत आहे. विधानसभेच्या निवडणूकीत निवडून येण्यासाठी राजा केणी यांनी साकडे घातले होते. तो कार्यक्रम करण्यात आमदार व्यस्त आहेत. परंतु शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी कोणत्याही प्रकारची दखल घेण्यास ते अपयशी ठरल्याची चर्चा आहे.