अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील आरसीएफ कंपनीविरोधात प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काच्या नोकऱ्यांपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप करत आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने तीव्र आंदोलन छेडले. प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य मागण्या, कोळी समाजाच्या विविध प्रश्नांवर तोडगा आणि पर्यावरणाशी संबंधित गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात शेकडो शिवसैनिकांनी सहभाग घेत ठिय्या आंदोलनासह रस्ता रोको करून प्रशासनाचे लक्ष वेधले. आंदोलनकर्त्यांनी भूमिपुत्रांना न्याय मिळावा आणि त्यांच्या रोजगाराच्या मागण्या तातडीने मान्य करण्यात याव्यात, अशी ठाम भूमिका मांडली.
यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी कंपनी प्रशासनाला २४ तासांचा अल्टिमेटम देत स्पष्ट इशारा दिला की, प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर तातडीने तोडगा न काढल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. त्यांनी पुढे सांगितले की, भूमिपुत्रांचा न्यायाचा लढा आता निर्णायक टप्प्यात आला असून सरकार आणि कंपनी प्रशासनाने तत्काळ भूमिका घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाची जबाबदारी त्यांच्यावर असेल.









