दुबार मतदारांवर करडी नजर


रायगडात ४ हजार १५६ दुबार मतदार
२,३७,५०३ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

 रायगड (प्रतिनिधी): राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. त्यात रायगड जिल्ह्यातील १० नगरपरिषदांचा समावेश आहे. नगरपरिषदांमधील २१७ सदस्य तर १० थेट नगराध्यक्ष निवडले जाणार आहेत.जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीसाठी दोन लाख ३७ हजार ५०३ मतदार आहेत. त्यात ४ हजार १५६ दुबार मतदार आहेत. या दुबार मतदारांवर निवडणूक यंत्रणेची करडी नजर असणार आहे. या मतदारांच्या नावासमोर डबल स्टार लावण्यात आले आहेत. या मतदारांना मतदानासाठी प्रभाग निवडायची संधी देण्यात येणार आहे. थेट मतदान केंद्रावर येणाऱ्या दुबार नाव असलेल्या मतदारांकडून मतदान एकाच ठिकाणी केल्याचे हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे, अशी माहिती रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगर परिषद, नगरपंचायतीची निवडणूक जाहीर केल्याने नगरपरिषद क्षेत्रात आणि शहराच्या लागत असणाऱ्या ग्रामीण भागात आचारसंहिता जाहीर झाली आहे.गरपरिषदा, नगरपंचायतींच्या हद्दीतील मतदारांवर प्रभाव पडेल, असे कार्यक्रम जिल्ह्यात इतरत्र घेता येणार नाही. तसे झाल्यास तो आचारसंहितेचा भंग ठरणार आहे, असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्यात असणाऱ्या १० नगर परिषदांमध्ये केलेल्या मतदार याद्यांच्या तपासणीमध्ये तब्बल चार हजार १५६ दुबार मतदार आढळून आले आहेत.यामध्ये खोपोली नगर परिषदेमध्ये सर्वाधिक ८९१ दुबार मतदार आढळले आहेत. त्याखालोखाल कर्जत नगर परिषद ८१७, पेण नगर परिषद ७८४, उरण नगर परिषद ७८१, महाड नगर परिषद ३५९, अलिबाग नगर परिषद २४४, श्रीवर्धन नगर परिषद १३१, मुरूड जंजिरा नगर परिषद ६९, रोहा नगर परिषद ६२ आणि माथेरान नगर परिषदेमध्ये १८ दुबार मतदारांची नावे आढळली आहेत, असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले.

नगर परिषद हद्दीमध्ये आढळलेल्या प्रत्येक दुबार मतदारांच्या घरी नगरपरिषदांचे अधिकारी- कर्मचारी जाणार आहेत. त्यांना नेमके कोणत्या प्रभागात किंवा नगरपरिषदेसाठी मतदान करायचे आहे, हे त्यांच्याकडून लिखित घेतले जाणार आहे. थेट मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी दुबार मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यावर त्यांच्या कडून हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे. मगर परिषद मधील प्रत्येक मतदाराला त्यांच्या द्विसदस्यीय प्रभागातील दोन उमेदवारांना प्रत्येक मत द्यायचे आहे. तर यंदा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने त्या उमेदवारालाही मतदारास तिसरे मत द्यावे लागणार आहे.

रायगड जिल्ह्यातील १० नगर परिषदांमधील निवडणुकीसाठी १०७ प्रभाग असणार आहेत. यामध्ये खोपोली सर्वात मोठी नगर परिषद असून या नगर परिषदेमध्ये १५ प्रभाग, पेण नगर परिषद १२ प्रभाग, अलिबाग, श्रीवर्धन, मुरूड जंजिरा, रोहा, महाड, उरण, कर्जत आणि माथेरान या नगर परिषदांमध्ये १० प्रभाग असणार आहेत. जिल्ह्यातील नगर परिषदांमध्ये २१७ नगरसेवक निवडण्यात येणार आहेत. यामध्ये खोपोली नगर परिषदेमध्ये ३१, पेन नगर परिषदेमध्ये २४, उरण २१, कर्जत २१, अलिबाग, श्रीवर्धन २०, मुरूड जंजिरा २०, रोहा २०, महाड २० आणि माथेरान नगर परिषदेमध्ये २० नगरसेवक सार्वत्रिक निवडणुकीद्वारे निवडण्यात येणार आहेत.

दहा नगर परिषदांसाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेमध्ये २ लाख ३७ हजार ५०३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये खोपोली, ६२ हजार ७४, अलिबाग १६हजार ३५४, श्रीवर्धन १२ हजार ६३७, मुरूड जंजिरा ११ हजार ५४४, रोहा १७ हजार ६६९, महाड २३ हजार १२४, पेण ३३ हजार ८७५, उरण २६ हजार २१४, कर्जत २९ हजार ९५७ आणि माथेरान नगर परिषदेमध्ये ४ हजार ५५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.