कचऱ्याच्या ढिगाऱ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
कर्मचाऱ्यांसह प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न कायम
अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग एसटी स्थानकातील बेफिकीर आणि गलथान कारभारामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. बसेस वेळेवर न लागणे, सीएनजी भरण्यास विलंब होणे आणि बसेसमध्ये वारंवार बिघाड होणे या समस्यांमुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोय होत असतानाच आता अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत आहे. स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर आणि बस थांबण्याच्या जागी कचऱ्याचे ढिगारे साचले असून, त्यातून दुर्गंधी पसरत आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिक आणि प्रवासी वर्गामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
अलिबाग एसटी स्थानकातून दररोज मुंबई, पुणे, ठाणे, रोहा, बोरीवली, अक्कलकोट आदी मार्गांवर हजारो प्रवासी प्रवास करतात. स्थानकात सुमारे ६०हून अधिक बसेस असून, अडीचशेहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. दरमहा सुमारे सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळूनही स्थानकातील मूलभूत सुविधा आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. प्रवाशांना बससाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागते, तर काही वेळा बसेस रस्त्यात बंद पडतात.
स्थानकातील स्वच्छतेसाठी एका खासगी कंपनीला ठेका देण्यात आला असून, या कंपनीमार्फत स्वच्छता राखली जाण्याची जबाबदारी आहे. मात्र, प्रत्यक्षात ही स्वच्छता केवळ कागदावरच असल्याची चर्चा सुरू आहे. प्लास्टिक आणि घनकचऱ्याचे ढिगारे स्थानक परिसरात दिवसेंदिवस वाढत असून, प्रवाशांना नाक दाबून मार्गक्रमण करावे लागत आहे.
स्थानकातील अस्वच्छता, वेळेवर न लागणाऱ्या बसेस आणि कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम म्हणून प्रवाशांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांनी लवकरात लवकर स्वच्छतेबाबत ठोस उपाययोजना करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.









