मतमोजणीचा विलंब वाढवतोय ताण; कार्यकर्त्यांमध्ये निराशेची भावना


रायगड (प्रतिनिधी): आज झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीनंतर मतमोजणी 21 नोव्हेंबर रोजी होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे निकालासाठी तब्बल 19 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार असून कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. इतका मोठा कालावधी ठेवल्यामुळे राजकीय पक्षांचे नेते, उमेदवार व कार्यकर्ते प्रचंड दडपणाखाली राहणार आहेत. सर्वांनाच मतमोजणी व निकाल जाहीर होईपर्यंत अनिश्चिततेचा ताण जाणवेल, अशी भावना व्यक्त होत आहे.

अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, निवडणूक पूर्ण झाल्यानंतर लगेच निकाल लागला असता तर सर्वांनाच दिलासा मिळाला असता. इतका विलंब झाल्यानं त्यांना मानसिक थकवा व निराशा जाणवत आहे. निकाल उशिरा येणार असल्याने गावी-परिसरातही चर्चांना आणि ताणतणावाला उधाण आलं आहे.

यावर प्रतिक्रिया देताना शेकाप नेते प्रशांत नाईक म्हणाले की, “ज्या ठिकाणी निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या नाहीत, तिथे मतमोजणी उद्याच व्हायला हवी होती. निकाल लांबणीवर टाकण्याची गरज आम्हाला वाटत नाही. विलंबामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि निराशा वाढत आहे.”

दरम्यान, मतमोजणीसंबंधी प्रशासनाचा निर्णय बदलण्याची शक्यता कमी असली तरी कार्यकर्ते आणि उमेदवार यांच्यात निकालाबाबतची उत्कंठा दिवसेंदिवस वाढत चालली आहे.