जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ रायगडात शेकापची बैठक; लाठीचार्जचा तीव्र निषेध


अलिबाग (प्रतिनिधी): दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचे पडसाद मंगळवारी रायगड जिल्ह्यात उमटले. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात सकाळी ९ वाजता महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले.

बैठकीला युवक, विद्यार्थी, पालक, शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. यावेळी विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. लोकशाही व्यवस्थेत शांततेच्या मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा संविधानिक अधिकार असून, आंदोलन दडपण्यासाठी बळाचा वापर करणे योग्य नसल्याची भूमिका उपस्थितांनी मांडली.

बैठकीत शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, ॲड. मानसी म्हात्रे, गौतम पाटील, सुरेश घरत, अनिल पाटील आणि परेश देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे संवेदनशीलतेने पाहून संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

बैठकीच्या शेवटी उपस्थितांनी देशातील लोकशाही, संविधानिक मूल्ये आणि राष्ट्रीय एकात्मता कायम राखण्याची सामूहिक शपथ घेतली. तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देत लोकशाही हक्कांच्या संरक्षणासाठी एकजुटीने उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.