सदस्यांची गळती; शेकापची राजकीय पकड कमकुवत


रायगड (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीनंतर रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाला (शेकाप) मोठे राजकीय हादरे बसले आहेत. पक्षातील अनेक प्रभावी नेते आणि कार्यकर्त्यांनी साथ सोडत इतर पक्षांचा मार्ग स्वीकारल्याने शेकापची अवस्था बिकट झाल्याचे चित्र आहे. जयंत पाटील यांचे भाचे आस्वाद पाटील, भाऊ माजी आमदार पंडित पाटील यांच्यासह चित्रा पाटील, भावना पाटील, प्रियदर्शिनी पाटील आणि संजय पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शेकापच्या नेतृत्वाला मोठा धक्का बसला आहे.
याशिवाय माणगाव येथील रमेश मोरे हे शिंदेसेनेत दाखल झाले असून अस्लम राऊत यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने पक्षातील गळती अधिकच वाढली आहे. अलिबागमध्येही शेकापच्या जिल्हा परिषद सदस्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने जिल्ह्यातील वर्चस्व लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. परिणामी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शेकापला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी कठोर संघर्ष करावा लागणार आहे.
दरम्यान, काँग्रेसची स्थितीही फारशी मजबूत नाही. त्यामुळे शेकाप, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांसाठी येणारी निवडणूक कसोटीची ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.