आंबेपूर मतदारसंघात परिवर्तनाचे वारे; रसिका केणी यांनी शड्डू ठोकला


अलिबाग (प्रतिनिधी): आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या परिवर्तनाचे वारे जोरात वाहू लागले असून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार रसिका राजा केणी यांनी निवडणूक मैदानात ठामपणे शड्डू ठोकला आहे. प्रचाराच्या सुरुवातीपासूनच आंबेपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मतदारांमध्ये नव्या नेतृत्वाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

प्रचारादरम्यान बोलताना रसिका केणी यांनी “तरुणांच्या हाताला काम आणि गावातच रोजगार” हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले. स्थानिक पातळीवर उद्योग, स्वयंरोजगार, महिला बचत गटांना प्रोत्साहन, तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आंबेपूरच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांवर विशेष लक्ष दिले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

दरम्यान, शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी अलिबाग जिल्हा परिषदेत १० पैकी १० जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. “जिल्ह्याचा विकास हाच आमचा अजेंडा असून, जनतेच्या विश्वासाच्या जोरावर आम्ही विजय मिळवू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एकूणच रसिका केणी यांच्या प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता, आंबेपूर मतदारसंघात यंदाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.