महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे दादांचे निधन ही राज्यासाठी मोठी हानी असल्याची भावना मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केली आहे. दादांनी केलेल्या कार्याचे सर्वच स्तरांतून कौतुक होत असून, महाराष्ट्राने नेमकं काय गमावलं यावर सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र, हे सर्व ऐकण्यासाठी आज दादा आपल्यात नाहीत, याची खंत त्यांनी व्यक्त केली.
आदिती तटकरे म्हणाल्या की, दादांनी नेहमीच भरभरून प्रेम दिलं. वडिलांप्रमाणेच त्यांचं मार्गदर्शन सतत मिळत आलं. कठीण प्रसंगीही त्यांनी प्रोत्साहन देत पुढे जाण्याची ताकद दिली. राजकारण असो वा सामाजिक क्षेत्र, दादांचा दृष्टिकोन नेहमीच सकारात्मक आणि दूरदर्शी होता.
तरुण, महिला आणि युवतींना संधी मिळाली पाहिजे, नव्या नेतृत्वाची घडण झाली पाहिजे, हा त्यांचा कायम आग्रह असायचा. अनेक तरुणांना त्यांनी विश्वास दिला, जबाबदाऱ्या सोपवल्या आणि नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल, असा विश्वासही आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.
दादांचे कार्य आणि विचार सदैव स्मरणात राहतील, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.









