खारेपाट विभागात कमळ फुलणार नाही— जयंत पाटील


ळखोटी बिलं काढणाऱ्यांना जनता जागा दाखवेल

जयंत पाटलांचा भाजप-शिवसेनेवर घणाघात

अलिबाग (प्रतिनिधी): खारेपाट विभाग हा नेहमीच क्रांतिकारी आणि लढाऊ विचारांचा राहिला आहे. या मातीत भाजपचे कमळ कधीही फुलणार नाही. विकासाच्या नावाखाली खोटी बिलं लाटणाऱ्यांना जनता या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देईल,अशा शब्दांत शेकापचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

​रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने पोयनाड येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य रॅली आणि सभेत ते बोलत होते. यावेळी खारेपाट विभागात जणू ‘लाल बावट्याचे वादळ’ आल्याचे पाहायला मिळाले.

जयंत पाटील म्हणाले की, शेकाप ही निवडणूक केवळ सत्ता मिळवण्यासाठी नाही, तर जिद्द, त्वेष आणि अन्यायाचा बदला घेण्यासाठी लढत आहे. यात महाविकास आघाडीला १०० टक्के यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विकासकामांची खोटी देयके काढून जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना मतदार कधीही स्वीकारणार नाहीत, असे म्हणत त्यांनी सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपवर निशाणा साधला.

पोयनाड येथील रॅलीला कार्यकर्त्यांची अलोट गर्दी उसळली होती. आंबेपूर आणि रुईशेत भोमोली मतदारसंघातील उमेदवारांच्या समर्थनार्थ निघालेल्या या रॅलीने संपूर्ण परिसर लालमय झाला होता.

या सभेला शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, अँड.गौतम पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. चित्रलेखा पाटील यांनीही आपल्या भाषणातून उपस्थितांमध्ये चैतन्य भरले.

खारेपाटचा गड पुन्हा एकदा लाल बावटाच राखणार, हे आजच्या गर्दीने सिद्ध केले आहे, असे प्रतिपादन यावेळी नेत्यांनी केले.