रायगड जिल्हा प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात
मतदान साहित्य घेऊन अधिकारी, कर्मचारी रवाना
अलिबाग (प्रतिनिधी): लोकशाहीचा उत्सव आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे.जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणसंग्रामासाठी उद्या मतदान पार पडणार आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता सर्वच ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
आवश्यक मतदान साहित्य घेवून मतदान अधिकारी, कर्मचारी नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर आज रवाना झाले. जिल्ह्यातील २ हजार ३२३ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. यासाठी जवळपास १२ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत पुरेशी पोलीस कुमक पाठवण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या ५९ तर पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी मतदान होणार असून १७ लाख ३८१ मतदार आहेत. ज्यात महिला मतदारांची संख्या अधिक आहे. ८ लाख ५४ हजार ९ महिला मतदार तर ८ लाख ४६ हजार ३४७ महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी ५ हजार ९५२ बॅलेट युनिट तर २ हजार ५०१ कन्ट्रोल युनिट वापरले जाणार आहेत.
उद्या सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे, त्यामुळे यंदा कुणाचं पारडं जड ठरणार आणि ग्रामीण भागाची सत्ता कोणाकडे जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.









