काळ हरला… कार्य अमर ठरलं! अजितदादा पवार यांना अलिबाग नगर परिषदेत अभिवादन


अलिबाग(प्रतिनिधी): महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अलिबाग नगर परिषदेत बुधवारी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नगर परिषदेच्या सभागृहात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नगराध्यक्षा अक्षया नाईक, सभापती प्रशांत नाईक, नगरसेवक, नगरसेविका तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.

यावेळी अजितदादा पवार यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा गौरव करण्यात आला. राज्याच्या पायाभूत सुविधा, स्थानिक स्वराज्य संस्था, जलसंधारण, ग्रामीण विकास आणि प्रशासनातील निर्णयक्षम नेतृत्वामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान दिल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. जनतेच्या प्रश्नांबाबत संवेदनशील राहून जलद निर्णय घेणारे नेतृत्व म्हणून अजितदादा पवार यांची ओळख कायम स्मरणात राहील, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

याप्रसंगी नगराध्यक्षा अक्षया नाईक म्हणाल्या,
“दिवंगत अजितदादा पवार यांनी विकासाला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले. लोकाभिमुख प्रशासन, निर्णयक्षम नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेले योगदान कायम प्रेरणादायी राहील. त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या सेवेसाठी अधिक जबाबदारीने कार्य करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”

सभापती प्रशांत नाईक यांनीही आपल्या भावना व्यक्त करत सांगितले,
“अजितदादा पवार हे दूरदृष्टी असलेले, अभ्यासू आणि कार्यक्षम नेतृत्व होते. त्यांनी विकासाची जी परंपरा निर्माण केली, ती पुढे नेणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करतो.”

उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “दिवंगत अजितदादा पवार यांनी विकासाला दिलेली गती, प्रशासनातील शिस्त आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही प्रत्येक लोकप्रतिनिधीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून जनतेच्या सेवेसाठी निष्ठेने कार्य करणे, हेच त्यांच्या स्मृतींना खरे अभिवादन ठरेल.”

कार्यक्रमात उपस्थित नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत नागरिकाभिमुख आणि विकासकेंद्री प्रशासन उभारण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.