अलिबाग(प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाने गाव पातळीवर गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना सर्वसमावेशक आणि सुलभ आरोग्य सेवा देण्यासाठी पॅलीएटिव्ह केअर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी आरोग्य केंद्र आणि आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये पॅलीएटिव्ह केअर सेवा सुरू होणार आहेत. जिल्हा रुग्णालयामध्ये किमान चार ते सहा बेड उपशामक काळजीसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. यामुळे गंभीर आजारांवरील उपचारांसाठी ग्रामीण भागातील रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही.
कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंड निकामी होणे, मेंदू विकार या आजारांनी ग्रस्त लाखो रुग्ण वेदना सहन करीत उपचारासाठी रुग्णालयाच्या फे-या मारत असतात. ग्रामीण भागातील रुग्णांना अशा आजारांवरील उपचारासाठी मोठी शहरे गाठावी लागतात. मात्र आता महाराष्ट्र शासनाने सार्वत्रिक राज्य पॅलीएटिव्ह केअर कार्यक्रम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने 2 फेब्रुवारी रोजी याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. पॅलीएटिव्ह केअरला ऐच्छिक नव्हे तर अत्यावश्यक सेवा म्हणून स्वीकारण्यात येणार आहे. जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालये ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ही सेवा सुरू केली जाणार आहे.
कर्करोग, हृदयरोग, मधुमेह, मज्जासंस्थेचे आजार, श्वसन विकार तसेच वृद्धापकाळातील संबंधित आजाराचे प्रमाण वाढत असून अनेक रुग्णांना दीर्घकालीन उपचार व सतत काळजीची गरज भासते. अशा रुग्णांना घरपोच सेवा व जीवनाच्या अंतिम टप्प्यात सन्मानपूर्वक काळजी मिळावी हा पॅलीएटिव्ह केअरचा मुख्य उद्देश आहे.
रुग्णांना मिळणा-या सेवा:
शासन निर्णयानुसार पॅलीएटिव्ह केअर सेवा केवळ अंतिम अवस्थेपुरते मर्यादित न ठेवता आजाराचे निदान झाल्यापासून उपचाराच्या संपूर्ण कालावधीत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्य, जिल्हा, तालुका, प्राथमिक व समुदाय स्तरावर सेवा निर्माण करणे, प्रशिक्षित व बहुविषयीक मनुष्यबळ तयार करणे, वेदनाशामक औषधांचा अखंड पुरवठा, जनजागृती, काळजी घेणा-यांना प्रशिक्षण व घरगुती सेवांना बळकटी देणे यावर भर दिला जाणार आहे.
गाव पातळीवरही पोहोचणार सेवा:
या कार्यक्रमाचा सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे मॉर्फिनसारखी प्रभावी वेदनाशामक औषधे थेट प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध करून देणे हा आहे. प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी आता प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ती औषधे लिहून देऊ शकणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना वेदना नियंत्रणासाठी जिल्हा रुग्णालयात धाव घ्यावी लागणार नाही.
असे असेल जिल्हा पॅलीएटिव्ह केअर समितीचे काम:
जिल्हा पॅलीएटिव्ह केअर समिती ही जीवघेण्या किंवा असाध्य आजाराने ग्रस्त (उदा. कर्करोग, अवयव निकामी होणे) रुग्णांना वेदनामुक्त आणि सन्मानजनक जीवन जगण्यासाठी आवश्यक उपशामक काळजी सेवा पुरवणारी संस्था आहे. नॅशनल प्रोग्रॅम फोर पॅलीएटिव्ह केअर अंतर्गत महाराष्ट्रात ही समिती रुग्णांना घरी किंवा केंद्रावर सेवा देण्यास मदत करणार आहे.
*********
पॅलीएटिव्ह केअर सेवा केवळ अंतिम अवस्थेपुरते मर्यादित न ठेवता आजाराचे निदान झाल्यापासून उपचाराच्या संपूर्ण कालावधीत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे गंभीर आजारांवरील उपचारांसाठी ग्रामीण भागातील रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. रुग्णांचा वेळ व प्रवासाचा खर्च वाचेल. वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. निशिकांत पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. प्राची नेहुलकर यांनी केले आहे.
**********
गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी पॅलीएटिव्ह केअर सेवा ही दिलासादायक ठरणारी आहे. यामुळे अशा रुग्णांना ग्रामीण स्तरावरदेखील वेळेत व योग्य उपचार मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक स्तरावरल शासकीय रुग्णालयांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत.
– नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी, राजिप









