रायगड जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत ओमकार वेश्वी व कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी विजेते


अलिबाग(प्रतिनिधी) : गोरगरिबांचे आधारस्तंभ व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर मैदानावर प्रौढ महिला व पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुरुष गटात ओमकार वेश्वी संघाने, तर महिला गटात कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी संघाने विजेतेपद पटकावले.
२० ते २२ फेब्रुवारीदरम्यान तीन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील १२८ पुरुष व ३२ महिला संघांनी सहभाग घेतला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर तसेच महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन चे माजी जनरल सेक्रेटरी ॲड. आस्वाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. पंचांची निष्पक्ष कामगिरी आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे स्पर्धेला भव्य यश लाभले.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात ओमकार वेश्वी संघाने शिवाई बांधण संघाचा पराभव करून अजिंक्यपद मिळवले. शिवाई बांधण संघ उपविजेता ठरला. जय बजरंग रोहा संघाने तृतीय, तर जयभवानी वाशी-पेण संघाने चतुर्थ क्रमांक मिळविला. महिला गटात कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीने विजेतेपद पटकावले. पनवेल स्पोर्ट्स क्लब उपविजेता ठरला, तर ओमकार वेश्वी व दत्तात्रेय क्रीडा पनवेल यांनी अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांक मिळवला.
स्पर्धेनंतर पारितोषिक वितरण सोहळा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी विविध मान्यवर, पदाधिकारी, प्रशिक्षक आणि कबड्डीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमृत महोत्सवानिमित्त कबड्डी असोसिएशनच्या वतीने रामशेठ ठाकूर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी कबड्डी हा आपल्या मातीतला अभिमानाचा खेळ असल्याचे अधोरेखित करण्यात आले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कबड्डीशी असलेले अतूट नाते स्मरून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या प्रेरणेने कबड्डीचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.