रायगड जिल्हा परिषदेत सत्तेसाठी हालचाली; शिवसेनेला डावलून भाजप–राष्ट्रवादीची सत्ता?


अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र येत सत्ता स्थापन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना (शिंदे गट) सध्या सत्तेच्या समीकरणाबाहेर राहू शकते, असे स्पष्ट संकेत भाजप नेते ॲड. आस्वाद पाटील यांनी दिले.
अलिबाग येथे आयोजित भाजप पक्षप्रवेश कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पाटील म्हणाले की, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची निवडणूकपूर्व युती होती. जिल्हा परिषदेत दोन्ही पक्षांनी मिळून बहुमताचा आकडा गाठला असल्याने स्वबळावर सत्ता स्थापनेचा आमचा प्रयत्न राहील. “सध्याच्या परिस्थितीत आम्ही दोन्ही पक्ष मिळून सत्ता स्थापन करू. शिवसेना शिंदे गटाला सहभागी करून घेण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
तथापि, राज्यस्तरीय नेतृत्वाच्या सूचनांनुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. “वरिष्ठांकडून आदेश आल्यास शिवसेनेलाही सत्तेत सहभागी करून घेण्याचा विचार केला जाईल,” असे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे स्थानिक पातळीवरील समीकरणांबाबत अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींवर अवलंबून असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या हालचालींमुळे स्थानिक राजकारण तापले असून विविध पक्षांतर्गत बैठका आणि चर्चांना वेग आला आहे. शिवसेना शिंदे गटाकडूनही या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याची माहिती मिळत आहे.
यावेळी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नव्याने पक्षप्रवेश केलेले सदस्य उपस्थित होते. पुढील काही दिवसांत सत्तास्थापनेचा औपचारिक दावा सादर केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.