जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पहिल्या बैठका २० मार्चपूर्वी घ्या – ग्रामविकास विभागाचे निर्देश


मुंबई(प्रतिनिधी): राज्यातील नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती व उपसभापती पदांच्या निवडीसाठी पहिल्या बैठका २० मार्च २०२६ पूर्वी आयोजित कराव्यात, असे निर्देश महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिले आहेत.

ग्रामविकास विभागाचे अवर सचिव बाबुराव महादू असोले यांनी याबाबत परिपत्रक जारी केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील १२ जिल्हा परिषद व १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती यांच्या निवडीसाठी कायद्यानुसार बैठक बोलावणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील कलम १९(१) व ४९(१) नुसार निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ पहिल्या बैठकीपासून सुरू होतो. त्यामुळे कायदेशीर तरतुदीनुसार पहिली बैठक नियोजित मुदतीत घेणे बंधनकारक असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

हे निर्देश रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर आणि परभणी जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहेत. तसेच संबंधित विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.