नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत नेते अजितदादा पवार यांचे नाव देण्याची मागणी लवकरच राज्य सरकारकडे करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी दिली आहे. या संदर्भात ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन औपचारिक मागणी सादर करणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मागणीला सकारात्मक निर्णय देतील असा ठाम विश्वास सुरज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
सुरज चव्हाण यांनी सांगितले की, राज्याच्या विकासात अजित पवार यांचे योगदान मोठे असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पाला त्यांचे नाव देणे योग्य ठरेल. याबाबत लवकरच सविस्तर निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, अलीकडे घडलेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणाची चौकशी केंद्रीय यंत्रणेकडे सोपवावी आणि त्याचा सविस्तर अहवाल जनतेसमोर मांडावा, अशीही मागणी सुरज चव्हाण यांनी केली आहे. पारदर्शक चौकशीमुळे नागरिकांचा विश्वास दृढ होईल, असे ते म्हणाले.
दरम्यान, नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबत चर्चा सुरू असतानाच नव्याने अजित पवार यांच्या नावाची मागणी पुढे आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या मागणीमुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्र नाराज असून नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमातळाच्या नामकरणाचा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









