अलिबाग तालुक्यातील कुरूळ गावातील सामान्य घरात वाढलेले ॲड. मनोज परशुराम ओव्हाळ यांनी आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ठसा उमटवला आहे. गावातील सदस्य म्हणून सुरुवात करत त्यांनी सरपंचपदाची जबाबदारीही यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या कार्यकाळात गावातील विकासकामांना गती मिळाली असून स्वच्छता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले.
ओव्हाळ यांनी स्वच्छता मोहिमा राबवत गावात जनजागृती केली, तसेच आरोग्य शिबिरे आयोजित करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवले गेले, ज्यामुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत भारतीय जनता पक्षाने त्यांची अलिबाग तालुका मंडळ सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे त्यांच्या जबाबदाऱ्या अधिक वाढल्या असून, पक्ष संघटन बळकट करण्यासाठी ते अधिक जोमाने कार्यरत राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सामान्य कुटुंबातून पुढे येत त्यांनी केलेल्या प्रगतीमुळे अनेक तरुणांसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत. सामाजिक बांधिलकी जपत राजकीय क्षेत्रातही सक्रिय राहण्याचा त्यांचा प्रवास निश्चितच उल्लेखनीय आहे.





