मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर रायगडात नव्या राजकीय समीकरणाची नांदी
जिल्ह्याच्या रिक्त पालकमंत्री पदाचा तिढाही लवकरच सुटण्याची शक्यता
रायगड (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यात गेल्या दीड वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटात सुरू असलेल्या तीव्र राजकीय संघर्षानंतर आता अनपेक्षितरीत्या महायुतीतील तिन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले आहेत. जिल्हा परिषद सत्तास्थापनेच्या निमित्ताने या नव्या राजकीय समीकरणाला आकार मिळाला असून, दीर्घकाळ सुरू असलेल्या वादावर पडदा पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात वेगवेगळ्या भागांत युती करून लढत दिली होती. या निवडणुकीत टोकाचे आरोप-प्रत्यारोप, शाब्दिक चकमकी आणि पाडापाडीचे राजकारण पाहायला मिळाले होते. निवडणुकीनंतर सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने एकत्र येत शिंदे सेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याची रणनीती आखली होती. मात्र शेवटच्या क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. त्यांच्या निर्देशानुसार तिन्ही पक्षांनी एकत्र येत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली.
या नव्या समीकरणानुसार अध्यक्षपदी भाजपचे मंगेश वाकडीकर, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर पाटील यांची निवड झाली आहे. विषय समित्यांच्या सभापतीपदी शिवसेना शिंदे गटाच्या रसिका केणी आणि चंद्रकांत कळंबे, भाजपचे वैकुंठ पाटील, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नारायण डामसे यांची निवड करण्यात आली आहे. या सत्तास्थापनेदरम्यान मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र दळवी, अनिकेत तटकरे आणि सुधाकर घारे हे प्रमुख नेते एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून असलेली कटुता काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या घडामोडींनंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसविरोधातील भूमिका काहीशी मवाळ केल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेनंतर आता रायगडमधील पालकमंत्री पदाचा तिढाही लवकरच सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





