मानकुळे गावातील पाणीटंचाईवर पंडितशेठ पाटील यांची तात्काळ दखल; अधिकाऱ्यांना दिले त्वरित उपाययोजनेचे निर्देश


अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील मानकुळे गावात पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याची बाब नुकत्याच माजी आमदार पंडितशेठ पाटील यांच्या भेटीदरम्यान उघड झाली. गावभेटीदरम्यान स्थानिक महिलांनी पंडितशेठ पाटील यांना पाण्याच्या तीव्र टंचाईबाबत आपली व्यथा मांडली. गावात नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून महिलांना लांब अंतरावरून पाणी आणावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
या समस्येची गांभीर्याने दखल घेत पंडितशेठ पाटील यांनी तत्काळ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. त्यांनी मानकुळे गावातील पाणीटंचाईची स्थिती स्पष्ट करून त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून लवकरच गावातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
पंडितशेठ पाटील यांच्या या तातडीच्या हस्तक्षेपामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः महिलांनी त्यांच्या या प्रतिसादाचे स्वागत करत लवकरच पाणीप्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.