महापुरुषांबाबत आक्षेपार्ह पोस्ट; रमेश भिडे विरुद्ध अलिबागमध्ये गुन्हा दाखल करा


अलिबाग (प्रतिनिधी) : सोशल मीडियावर महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह आणि अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी पुणे येथील रमेश भिडे या व्यक्तीविरुद्ध अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा. फेसबुक अकाउंटच्या माध्यमातून भिडेने स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्याच्या आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे तसेच आंग्रे घराण्याबाबत अर्वाच्य आणि बदनामीकारक पोस्ट केल्याचा आरोप आहे. याशिवाय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतही अत्यंत खालच्या पातळीवरील भाषेचा वापर करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकाराची गंभीर दखल घेत श्रीमान रघुजीराजे आंग्रे यांनी तत्काळ संबंधित माहिती संकलित करून कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतला. त्यानुसार अलिबाग नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे आणि रघुजीराजे आंग्रे यांनी आज अलिबाग पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली.
तक्रारीनुसार, महापुरुषांचा अपमान करून समाजातील सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रमेश भिडे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 196 (1), 299, 352, 353(3) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा.
अलिबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी श्री. किशोर साळे यांनी या प्रकरणात तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून पुढील तपास सुरू आहे.