अलिबाग (प्रतिनिधी) : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा (अलिबाग) यांच्या सौजन्याने रायगड जिल्हा पोलीस दलाला मोठ्या प्रमाणात साहित्याचे वाटप करण्यात आले. शुक्रवारी (दि. 17 एप्रिल 2026) रायगड पोलीस मुख्यालय, अलिबाग येथे झालेल्या कार्यक्रमात 615 बॅरिकेड्स तसेच 16 ब्रेथ अॅनालायझर मशीन पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले.
हे साहित्य प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ. सचिन दादा धर्माधिकारी, श्री. उमेश दादा धर्माधिकारी व श्री. राहुल दादा धर्माधिकारी यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती अंचल दलाल यांच्याकडे देण्यात आले. यापूर्वीही दि. 27 मार्च 2025 रोजी पोलीस कल्याण निधीसाठी 5 लाख रुपयांची मदत प्रतिष्ठानकडून देण्यात आली होती.
या उपक्रमाबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी प्रतिष्ठानचे आभार मानले.
वाहतूक नियंत्रण व अपघात प्रतिबंधासाठी उपयुक्त
रायगड जिल्ह्यात वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर हे 615 बॅरिकेड्स वाहतूक नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. तसेच ब्रेथ अॅनालायझर मशीनमुळे मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर प्रभावी कारवाई करता येणार असून, अपघातांचे प्रमाण कमी करण्यास मदत होणार आहे.
ही सर्व यंत्रसामग्री जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये वितरित करण्यात येणार असून, यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच रस्ते सुरक्षा अधिक बळकट होणार आहे.






