अलिबागमध्ये भाजपमध्ये युवा नेत्यांचा उत्साहपूर्ण प्रवेश; संघटन बळकट होण्याची चिन्हे


अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग शहरातील राजकीय घडामोडींना वेग देत युवा नेतृत्व अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हिमांशू कोटियन, मुलकित छेद्धा, अरमान अनवरे आणि अंकेश साखरकर यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) उत्साहपूर्ण प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे अलिबागमधील भाजप संघटनेला नवे बळ मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे.
या प्रवेश सोहळ्यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. तसेच पेण आणि अलिबाग येथील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अलिबाग तालुका अध्यक्ष रोशन भगत, अशोक वारगे तसेच सचिव पुनित शेठ यांनीही यावेळी उपस्थित राहून नव्या सदस्यांचे स्वागत केले.
या युवा नेत्यांच्या पक्षप्रवेशामागे सरचिटणीस आदित्य जैन यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे अलिबाग शहरातील भाजप युवा मोर्चाला नवचैतन्य प्राप्त झाले असून, स्थानिक पातळीवर पक्ष संघटन अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नवीन सदस्यांच्या आगमनामुळे अलिबागमध्ये भाजपच्या युवा मोर्चाला नवी ऊर्जा मिळाली असून, आगामी काळात पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक व्यापक आणि प्रभावीपणे वाढेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.