मुरुडमध्ये अल्पवयीन मुलगी गर्भवती; लैंगिक अत्याचारप्रकरणी विधी संघर्षित बालक ताब्यात”


अलिबाग (प्रतिनिधी): मुरुड तालुक्यात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराची गंभीर घटना उघडकीस आली असून या प्रकरणी विधी संघर्षित बालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित बालकाला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी कर्जत येथील बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी (वय ५२) यांच्या १६ वर्षे १० महिने वयाच्या अल्पवयीन मुलीशी जानेवारी २०२६ ते मार्च २०२६ या कालावधीत गैरवर्तन झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात १४ वर्षे १० महिने वयाच्या विधी संघर्षित बालकाचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार संबंधित मुलगी तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यानंतर कुटुंबीयांनी तातडीने रेवदंडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ६७/२०२६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेऊन कर्जत येथील बाल सुधारगृहात पाठविण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक नामदेव आंगज पुढील तपास करीत आहेत.