किहीम बंदरावर बैलगाडी शर्यतीचा थरार; आद्य अमित नाईक यांचे पुन्हा निर्विवाद वर्चस्व


अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील किहीम बंदर येथे आज या वर्षातील अखेरची बैलगाडी शर्यत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. रायगड जिल्ह्यासह परिसरातील हजारो बैलगाडीप्रेमींनी उपस्थित राहून या रोमांचकारी शर्यतीचा आनंद घेतला. स्पर्धेमध्ये विविध भागांतील नामांकित बैलगाडी मालक आणि शौकिनांनी सहभाग घेतला होता.
यंदाच्या हंगामातील शेवटच्या शर्यतीत पुन्हा एकदा आद्य अमित नाईक यांनी आपल्या दमदार कामगिरीची छाप उमटवत फायनल फेरीत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या बैलगाडीने सुरुवातीपासूनच वेग, समन्वय आणि ताकदीचे उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली.
विशेष म्हणजे, या संपूर्ण वर्षभरात बैलगाडी क्षेत्रात आद्य अमित नाईक यांच्या “बैजा” आणि  “पाखऱ्या” या जोडीने अक्षरशः निर्विवाद वर्चस्व गाजवले. अनेक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण यश मिळवत या जोडीने बैलगाडी शर्यतीतील आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अंतिम शर्यतीतील विजयामुळे त्यांच्या यशस्वी हंगामावर आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.
किहीम बंदर परिसरात झालेल्या या शर्यतीदरम्यान प्रेक्षकांनी जल्लोषात विजेत्यांचे स्वागत केले. पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या बैलगाडी शर्यतींना ग्रामीण भागात आजही मोठे महत्त्व असून, युवकांमध्येही या खेळाबद्दल मोठे आकर्षण पाहायला मिळत आहे.
या अंतिम शर्यतीने यंदाच्या बैलगाडी हंगामाची दिमाखदार सांगता झाली असून, पुढील हंगामासाठी शौकिनांमध्ये आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे.