जेन झींची ताकद; ‘कॉकरोच जनता पार्टी’मधून तरुणांचा संताप व्यक्त


रायगड (प्रतिनिधी): देशातील तरुणाई आता केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित न राहता विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर थेट भूमिका घेऊ लागली आहे. सरन्यायाधीशांच्या एका वक्तव्याच्या निषेधार्थ आज देशभरातील अनेक तरुण एकत्र आले असून, त्यांनी उपरोधिक पद्धतीने ‘कॉकरोच जनता पार्टी’ची घोषणा करत आपला संताप व्यक्त केला आहे. या अनोख्या आंदोलनाची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

तरुणांनी सुरू केलेल्या या मोहिमेमागे व्यवस्थेतील वाढता असंतोष, राजकीय घडामोडींवरील नाराजी आणि न्यायव्यवस्थेबाबत निर्माण झालेले प्रश्न असल्याचे बोलले जात आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’ हे नाव प्रतीकात्मक असून, कोणत्याही परिस्थितीत टिकून राहणाऱ्या सामान्य जनतेची मानसिकता आणि संघर्ष यातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा नृपाल पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “ही सरकार आणि व्यवस्थेच्या तोंडावर मारलेली सणसणीत चपराक आहे. जेन झी पिढी आता अन्याय आणि विसंगतीविरोधात थेट आवाज उठवत आहे. तरुणांचा हा उद्रेक व्यवस्थेला गंभीर इशारा देणारा आहे.”

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या मोहिमेशी संबंधित पोस्ट, मीम्स आणि प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, अनेक तरुणांनी या आंदोलनाला समर्थन दर्शवले आहे. काहींनी याला लोकशाहीतील नव्या प्रकारचा विरोध मानले, तर काहींनी या प्रकारावर टीकाही केली आहे.
राजकीय आणि सामाजिक वर्तुळात या घडामोडींची जोरदार चर्चा सुरू असून, आगामी काळात या आंदोलनाचे पडसाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.