अलिबाग (प्रतिनिधी): नागाव येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला’ रायगड जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन शरद राऊळ यांनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. महसूल विभागामार्फत सामान्य नागरिकांच्या विविध महसुली अडचणी तत्काळ सोडवण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम नागरिकांसाठी अत्यंत लाभदायी ठरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शासनाच्या विविध योजना व सेवा थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अशा शिबिरांमधून प्रभावीपणे घडत असून, नागरिकांना त्यांच्या समस्यांवर त्वरित मार्गदर्शन आणि निराकरण मिळत असल्यामुळे प्रशासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे मत डॉ. राऊळ यांनी व्यक्त केले.
या शिबिराच्या प्रसंगी तहसीलदार विक्रम पाटील, पंचायत समिती सदस्य शरद भाऊ गोंधळी तसेच रेवदंडा ग्रामपंचायत सरपंच हर्षदा मयेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी नागरिकांच्या समस्या समजून घेत विविध महसुली विषयांवर मार्गदर्शन केले.
शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होऊन जनतेच्या प्रश्नांचे जलदगतीने निराकरण व्हावे, हीच अपेक्षा असल्याचे डॉ. सचिन शरद राऊळ यांनी यावेळी सांगितले.





