अलिबाग (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणानंतरच्या करिअरच्या विविध संधींची माहिती मिळावी आणि त्यांच्या भविष्यास योग्य दिशा मिळावी या उद्देशाने श्री. दिलीप (छोटम) विठ्ठल भोईर चॅरिटेबल ट्रस्ट, झिराड आणि उत्कर्ष फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चौल चंपावती येथील पाठारे क्षत्रिय समाज सभागृहात करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. बेलोशी जिल्हा परिषद क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवडताना स्वतःची आवड, क्षमता आणि भविष्यातील रोजगाराच्या संधींचा विचार करून निर्णय घेण्याचे आवाहन केले. योग्य मार्गदर्शनाच्या आधारे घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांच्या यशस्वी भविष्यासाठी महत्त्वाचा ठरतो, असे त्यांनी सांगितले.
डॉ. सचिन राऊळ यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाचा अनुभव सांगत विद्यार्थ्यांना मेहनत, जिद्द आणि पालकांच्या कष्टांची जाणीव ठेवण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमात प्रतीक सावंत आणि डिमेलो यांना आयटी कंपनीचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच उत्कर्ष फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत आयटी प्रशिक्षण, रोजगार सहाय्य आणि कौशल्य विकासाबाबत माहिती देण्यात आली. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यातील करिअरविषयीचा संभ्रम दूर होण्यास मदत झाली.






