अलिबाग (प्रतिनिधी): पोयनाड हायस्कूल माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष, आदर्श शिक्षक, एन.सी.सी. कमांडंट तसेच शेतकरी कामगार पक्षाचे खारेपाट विभागातील ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते तुकाराम दिनकर पाटील (टी. डी. पाटील सर) यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
टी. डी. पाटील सर यांनी आपल्या शिक्षकी जीवनात अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य केले. अलिबाग तालुक्यातील कोलघर यांसारख्या दुर्गम भागातील आदिवासी निवासी शाळांमध्ये जाऊन त्यांनी शिक्षणाची चळवळ उभी केली. विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण करणे, शिस्त लावणे आणि दहावीचा निकाल १०० टक्के लागावा यासाठी ते सातत्याने मेहनत घेत असत.
शिस्तप्रिय आणि विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती.
एन.सी.सी. कमांडंट म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, नेतृत्वगुण आणि शिस्तीची जाणीव निर्माण केली.
त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान देखील करण्यात आला होता.
राजकीय क्षेत्रात त्यांनी शेतकरी कामगार पक्षाशी अखेरपर्यंत निष्ठा राखत खारेपाट विभागात पक्षवाढीसाठी मोठे योगदान दिले. तसेच ते शेकाप नेते जयंत पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणूनही परिचित होते. साधी राहणी, प्रामाणिक विचार आणि समाजासाठी झटणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते सर्वांच्या मनात कायम स्मरणात राहतील.
त्यांच्या पश्चात कुटुंबीय, मित्रपरिवार, विद्यार्थी व मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या निधनाने खारेपाट विभागातील एक तळमळीचा शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता आणि मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.





