विदर्भात उष्णतेचा कहर; कोकण-मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता


रायगड (प्रतिनिधी): राज्यात गेल्या २४ तासांत मान्सूनपूर्व हवामानाचे विविध रंग पाहायला मिळाले. कोकण आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, तर विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम असून काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील पाच ते सहा दिवस विदर्भात उष्णता कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
२४ मे रोजी दुपारपर्यंत इन्सॅट-3डीआर उपग्रहाने टिपलेल्या दृश्यांमध्ये महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात ढगांची निर्मिती झाल्याचे दिसून आले. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. दक्षिण भारताच्या किनारी भागातून समुद्रावरील बाष्पयुक्त वारे राज्याकडे येत असल्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
दुसरीकडे राजस्थानकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे शनिवारी तापमान तब्बल ४७.१ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले. मराठवाड्यातही तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेष म्हणजे रात्रीचे तापमानही ३० ते ३२ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज असल्याने उकाड्यात अधिक भर पडणार आहे.
२४ मेच्या रात्रीसाठी अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर अकोला, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, कोकणातील पालघर वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. २५ मे रोजी पुण्याच्या घाटमाथा आणि पठारी भागांसह अहिल्यानगर, बीड, सोलापूर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नैरत्य मोसमी वारे अद्याप भारताच्या मुख्य भूमीपर्यंत पोहोचले नसले तरी पुढील तीन ते चार दिवसांत मान्सून आणखी पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.