रिलायन्स अधिकाऱ्याला धमकी; पाच जणांविरोधात गुन्हा


अलिबाग (प्रतिनिधी) : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नागोठणे प्रकल्पातील डेप्युटी जनरल मॅनेजर रमेश धनावडे यांच्या कार्यालयात घुसून शिवीगाळ, गोंधळ घालणे व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाच जणांविरोधात नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
झोतिरपाडा (ता. पेण) येथील करुणा तरे, रंजना तरे, सरिता पाटील, राजेंद्र तरे आणि प्रमोद तरे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाला स्वच्छता व गाळ काढण्याच्या कामावरून निर्माण झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
४ जून रोजी संबंधितांनी रिलायन्सच्या कार्यालयात विनापरवानगी प्रवेश करून आरडाओरडा, शिवीगाळ व धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. कंपनीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणाचा पुढील तपास नागोठणे पोलिसांकडून सुरू आहे.