खारघर (प्रतिनिधी) : नवी मुंबईतील खारघर परिसरातील कोपरा गाव स्मशानभूमी येथे शुक्रवारी (१२ जून) एक धक्कादायक घटना उघडकीस आली. स्मशानभूमी परिसरातील पाण्याच्या टाकीत एका अज्ञात व्यक्तीचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे स्मशानभूमीतील सुरक्षा व देखरेखीच्या व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित मृतदेह सुमारे महिनाभर पाण्याच्या टाकीत पडून असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. परिसरात तीव्र दुर्गंधी पसरू लागल्यानंतर स्थानिकांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानंतर प्रशासनाला माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पनवेल महापालिकेचे अधिकारी, अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब झाल्याने तो बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला पाण्याची टाकी फोडण्याची वेळ आली. मोठ्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला असून तो शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, कोपरा स्मशानभूमीसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा नसल्याचे समोर आले आहे. तसेच परिसराच्या नियमित देखरेखीसाठी कायमस्वरूपी कर्मचारीही उपलब्ध नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे इतक्या दिवसांपासून मृतदेह टाकीत असताना कोणाचेही लक्ष कसे गेले नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सध्या मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. संबंधित व्यक्ती पाण्याच्या टाकीत नेमकी कशी पोहोचली, हा अपघात होता की घातपात, अथवा अन्य कोणते कारण यामागे आहे का, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
या घटनेमुळे स्मशानभूमीतील सुरक्षा यंत्रणा, देखरेख व्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांबाबत प्रशासनाची जबाबदारी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून पुढील तपासानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
Home ताज्या बातम्या खारघरच्या कोपरा स्मशानभूमीत पाण्याच्या टाकीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह






