ओमराजे निंबाळकरांना मोठा धक्का? पक्षांतराच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर नाराजीचा सूर


धाराशिव (प्रतिनिधी): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदारांच्या संभाव्य बंडखोरीच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. ठाकरे गटातील तब्बल सहा खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू असून, या घडामोडींमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नावही आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र दिल्याची चर्चा आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी आवश्यक निधी मिळत नसल्याची भावना आणि पक्षाकडून अपेक्षित पाठबळ न मिळाल्यामुळे हे खासदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या घडामोडींनंतर ठाकरे गटाने तातडीने आपल्या सर्व खासदारांना व्हिप जारी केला असून दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीस सर्व खासदारांनी उपस्थित राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे संभाव्य बंडखोर खासदार या बैठकीला उपस्थित राहतात की नाही, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर त्यांनी स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही. “मी सध्या दिल्लीत नसून पुण्यात आहे,” असे त्यांनी सांगितले. मात्र, आपण पुढेही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार का, या प्रश्नावर त्यांनी मौन बाळगल्याने त्यांच्या राजकीय भूमिकेबाबतच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे.
या सर्व घडामोडींचा परिणाम सोशल मीडियावरही दिसून येत आहे. पक्षांतराच्या चर्चेनंतर ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात अनेक नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांना मोठ्या प्रमाणात ‘अनफॉलो’ करण्यात आल्याची चर्चा असून, एका दिवसात सुमारे सहा हजार फॉलोअर्सनी त्यांची साथ सोडल्याचा दावा करण्यात येत आहे.
ओमराजे निंबाळकर यांची सोशल मीडियावर मोठी लोकप्रियता असून तरुणांमध्ये त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. मात्र, संभाव्य पक्षांतराच्या चर्चांमुळे अनेक समर्थकांनी नाराजी व्यक्त करत संतापजनक प्रतिक्रिया दिल्याचे दिसून येत आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेनंतर सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात टीका वाढल्याचेही पाहायला मिळत आहे.
आता दिल्लीतील बैठकीत ओमराजे निंबाळकर उपस्थित राहतात का आणि ते आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करतात का, याकडे धाराशिवसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आगामी काही तासांत या राजकीय नाट्याला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.